लक्ष्मीमाता मंदिर, श्रीगोंदा
नगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे असणारे श्रीगोंदा हे ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेले शहर होय. श्रीगोंदा हे शहर सरस्वती नदीच्या काठी वसलेले असून प्राचीनकाळी या नगरीला ‘श्रीपूर‘ असे नाव होते. या श्रीपुरचे मध्ययुगात 'चांभारगोंदे’ झाले व आज श्रीगोंदा म्हणून ओळखले जाते. श्रीगोंदा या नगरीला दक्षिण काशी म्हटले जाते कारण या ठिकाणी प्राचीन असंख्य मंदिरे आहेत. या ठिकाणची प्राचीन, यादवकालीन व मराठाकालीन मंदिरे पाहिली की श्रीगोंदा शहराच्या वैभवाची आपल्याला साक्ष पटते.
श्रीपूर हे नाव श्रीलक्ष्मीच्या येथील वास्तव्यावरून पडल्याचे श्रीपूर महात्म्य ग्रंथात म्हटले आहे. गावच्या या लक्ष्मीचे स्वतंत्र मंदिर श्रीगोंदा शहरातील शिंपी गल्लीत दुरावस्थेत उभे असून आज आपल्या अनास्थेमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मंदिर बाभळीने व गवताने वेढलेले असून सर्व बाजुंनी बांधकाम असल्याने मंदिराकडे जाण्यासाठी कुठूनही स्वतंत्र असा मार्ग नाही. एका इमारतीच्या खाजगी पार्किंग मधून आपल्याला मंदिराकडे जावे लागते. प्रथमदर्शनी लगेच आपल्याला मंदिर दृष्टीस पडत नाही, परंतु जवळ गेल्यानंतर मंदिराचे सौंदर्य व त्यावरील शिल्पंकला आपल्याला स्तिमित करते. पण त्याच बरोबर मंदिराची आजची अवस्था पाहून मन मात्र उद्विग्न होते.
श्रीलक्ष्मी मातेचे मंदीर यादवकालीन असून दक्षिणाभिमुख आहे. मंदिराचा मुखमंडप चार स्तंभावर तोललेला असून स्तंभावर विविध प्रकारचे सुबक असे सुंदर शिल्पांकन आहेत. सभामंडपाची द्वारशाखा देखील शिल्पंजडीत आहे. मंदिरातील श्रीलक्ष्मी मातेची मूर्ती मात्र आपल्याला आता येथे दिसत नाही. मूर्ती ऐवजी सभामंडपातच वज्रपीठावर श्रीलक्ष्मी मातेच्या मूर्तीचे छायाचित्र ठेवलेले आहे. मंदिरातील लक्ष्मी मातेची मूर्ती जवळच असणाऱ्या केणी मंदिरात सध्या ठेवलेली आहे.
गावाला संपत्ती व सुबत्ता देणाऱ्या श्रीलक्ष्मीचे इतके सुंदर व प्राचीन मंदिर आज मात्र आपल्या अनास्थेमुळे अडगळीत पडले आहे. "गावच्या लक्ष्मीकडे जाण्यासाठी मार्गच नाही तेव्हा गावात लक्ष्मी येणार कशी..." गावातील एका वृध्द व्यक्तीने विचारलेला हा प्रश्न आपल्याला विचार करायला मात्र नक्कीच भाग पाडल्या शिवाय राहत नाही.
Comments
Post a Comment