गड किल्ल्याच्या बांधकामात मळलेल्या चुन्याचे महत्व.मळलेला चुना तयार करणे

गड किल्ल्याच्या बांधकामात मळलेल्या चुन्याचे महत्व.
मळलेला चुना तयार करणे
सध्याच्या आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानामध्ये रेडी मिक्सर हा महत्वाचा घटक आहे. स्टील, सिमेंट, वाळू, खडी, पाणी यांचे मिश्रण वापरले जाते. असे साहित्य वापरूनही इमारती पडलेल्या कोसळलेल्या आपण पाहतो. तीनचारशे वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी बांधलेली बांधकामे आजही कशीकाय शाबूत आहेत. आपले पूर्वज बांधकामशास्त्रात किती प्रगत होते यावरून लक्षात येते.
चुना हे पूर्वीच्याकाळी बांधकाम साहित्य म्हणून वापरत असत. अलीकडील बांधकाम पद्धतीमध्ये  चुन्याचा वापर होताना दिसत नाही. त्याएवजी सिमेंट वापरले जाते. चुना पर्यावरणपूरक टिकाऊ मजबूत असल्याने व तो गावोगावी चुनखडीच्या शेतात सहज मिळत असल्याने त्याचा पूर्वीच्या काळी वापर होत असे. बांधकामातील महत्वाचा घटक म्हणजे दगडाचे व विटांचे सांधे भरण्यासाठी लागणारा चुना. तो कसा बनवला जात असे तो पाहुयात.
जिथे चुनखडीचे दगड किंवा चुनखडीची जमीन असते तेथील गाव शिवारातून चुन्याचे दगड गोळा करून मोठ्या भट्टीत चुन्याचे दगड भाजले जात असत. अशा भाजलेल्या चुन्याचे खडे पाण्यात टाकले की फसफसून   चुन्याचे खडे फुटून पांढरा शुभ्र चुना बनत असे. असा चुना भट्टीतून काढून तो थंड झाल्यावर त्यावर प्रक्रिया करत.
चुन्याचा घाना.
बांधकामाच्या चुन्याचे उत्तम एकसंघ मिश्रण व्हावे म्हणून चुन्याचा मसाला तयार करण्यासाठी गोल वर्तुळाकार रिंगण दीडदोन फूट खोल व फूटदीड फूट रुंदीची दगडी नाला बनवत. मसाला कुटण्यासाठी चाक सुद्धा दगडी असायचं. चाकाचे वजन साधारणतः १ ते २ हजार किलो पर्यंत. चाकाला  मध्यभागी होल असे. हे चाक त्या घाणीत उभे ठेवत. त्या चाकात आडवे लाकूड घालून मध्यभागी रोवलेल्या लाकडी खांबाला किंवा फिरत्या आसाला ते बांधत. हे चाक बैलांच्या सहाय्याने गोल फिरवत.
चुना मळण्याच्या आगोदर पाणी मारून घाणी पूर्णपणे ओली करून घेतात. मग त्यामध्ये चुन्याची फक्की व पाणी यांचे मिश्रण सुमारे १८० फेरे होईपर्यंत मळला जात असे. व त्यानंतर त्या घाणीत मळलेल्या चुन्यावर दोनदा स्वच्छ धुतलेली ओली वाळू क्रमाक्रमाने त्यात मिसळून मळणे चालू ठेवतात.मळताना चाकाचे पुन्हा  १८० फेरे होईपर्यंत चुना चांगला मळला जात असे. अशा मळण्याच्या क्रियांमुळे मिश्रण एकजीव बनते. जास्त फेरे झाल्यानतंर चुना पाणी आणि वाळू यांचे विभाजन होते. ते मिश्रण एकजीव रहात नाही, पाणी टाकताना ते एकूण प्रमाणापेक्षा जास्त होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. त्यानंतर त्यामध्ये डिंक, हिरडा, मेन, गुळ, भोकराच्या बिया, बाबळीच्या बिया, बिब्याचे द्रावण, कापूस, उडदाचे पीठ, भेंडी, जवसाचे पाणी, वृक्षाचा डिंक, त्रिफळाचे पाणी, हरबरा डाळीचे किंवा गव्हाचे शिजवलेले पीठ, खूप पिकलेल्या केळीचे चूर्ण. (ज्या भागात जे उपलब्ध असेल ते) असे प्रमाणित घटक मजबुतीसाठी मिसळून ते मिश्रण बांधकामासाठी व सांधे भरण्यासाठी वापरले जाई. ही प्रक्रिया खूप कष्टाची व वेळखाऊ असल्यामुळे श्रीमंत लोकांनाच असे बांधकाम परवडत असे, सामान्य लोक माती व इतर नैसर्गिक साधनांचा वापर करत.
चुन्याचा दगड भट्टीत भाजला जातो. भट्टीतील उष्णतेमुळे चुन्याच्या दगडातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्याचे विघटन होते. अशुद्ध द्रव्ये वेगळी होतात. भाजलेल्या चुन्याचा दगड वजनाने हलका, आकारमानात वाढ झालेला आणि सच्छिद्र असतो. त्यास चुनकळी म्हणतात. अशा चुनकळीवर पाणी टाकले असता फसफसण्याचा आवाज होतो. उष्णता निर्माण होते. आणि काही वेळातच भूग्यात रुपांतर होते. चुन्यावर पाणी हे रासायनिक प्रक्रिया करते. पाण्याच्या प्रमाणावर चुन्याचे दोन प्रकार पडतात. चुनकळीच्या १/३  पाणी वापरले तर शुभ्रवर्णी चुन्याची पूड मिळते. तिला चुन्याची फक्की म्हणतात. आणि पाणी जर जास्त वापरले तर चुन्याची पुटटी मिळते.
चुना भाजून तयार झाला म्हणजे त्याला कळीचुना असे म्हणतात. त्या कळीचुन्याच्या वजनाच्या तिसऱ्या  हिश्श्याइतके पाणी घातले म्हणजे तो सर्व चुना विरतो. साधारण मळलेल्या चुन्यांत ४ पट किंवा ५ पट स्वच्छ धुतलेली ओली वाळू  घातली असता अशा संयोजकाची मजबुती विटांच्या मजबुतीपेक्षांही जास्त राहते. ज्या ठिकाणी विटांचे बांधकाम करतात अशा ठिकाणी चुन्याचा एक भाग, रेतीचा एक भाग व सुरकीचा एक भाग ह्यांचे संयोजक द्रव्य बनवितात. चुन्याच्या दीडपट किंवा दुप्पट रेती चुन्यांत घालून नंतर तो चुना घाणीमध्ये घालतात. घाणीमध्ये चुना साधारणरीतीने घट्टच राहील इतके पाणी घालत. जास्त पाणी घातले असता चुना चांगला मळला जात नाही.
उत्तम प्रतीचा चुना कमीतकमी २० ते २५ दिवस भिजत ठेवावा लागतो. चुना मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेत असल्याने वरचेवर त्यामध्ये पाणी घालावे लागते.
साधारणता एक बॅरल २०० लिटर पाण्यामध्ये १५ ते २० किलो गुळ, ५ किलो डिंक, ५ /१० बेलफळाचा मुरंबा, हिरडा, मेन, भोकराच्या बिया, बाबळीच्या बिया, बिब्याचे द्रावण, कापूस, उडदाचे पीठ, भेंडी, जवसाचे पाणी, वृक्षाचा डिंक, त्रिफळाचे पाणी, हरबरा डाळीचे किंवा गव्हाचे शिजवलेले पीठ, खूप पिकलेल्या केळीचे चूर्ण. २ ते ५ किलोपर्यंत आवश्यकते प्रमाणे घालावे. हे मिश्रण आठ दिवस भिजत ठेवावे व वरचेवर ढवळत रहावे.
वरील सर्व मिश्रण तयार करताना पुढील पदार्थ एकत्र करावेत. वाळू १५ भाग + चुना ८ भाग विटांचा चुरा ५ भाग,  आणि मिश्रित केलेले गुळपाणी ५ भाग.
इच्छित ठिकाणी चुना ओतणे
बांधकामांत चुना वापरावयाच्या वेळी बांधकामासाठी लागणारी जागा, दगड किंवा विटा चांगल्या भिजवून घ्याव्या लागतात. जमीन कोरडी असेल तर पाण्याचा मारा करून ओलसर करून घ्यावी लागते.  भिजवल्यामुळे सांध्यातील चुना विटांना किंवा दगडांना धरून राहतो. नाहीतर चुन्यांतील पाणी विटा/दगड शोषून घेऊन चुना कोरडा पडतो व त्यामुळे काम मजबूत होत नाही. विटा आपल्या वजनाच्या एकषष्ठांश (१/६) इतके पाणी शोषून घेऊ शकतात. म्हणून बांधकामांत वापरावयाच्या पूर्वी त्या पाण्यांत १०/१२ तास तरी अगोदर भिजवून ठेवाव्या लागतात.
दोन दगडाच्या किंवा विटांच्या मध्ये चुना भरला जातो तेव्हा तो दगडाच्या वर येऊ नये. दोन दगडामध्ये जेवढी जागा आहे तेवढ्याच जागेत चुना दाबून बसवावा. व दोन दगडाच्या फटीमधून चुना बाहेर येऊ नये. चालू कामामध्ये दोन्ही दगडाचे फटीमध्ये चुना दाबून बसण्यासाठी रंध्याच्या कोपऱ्याने दाबावे.
पूर्वी बांधकामात चुनखडी व शंखशिंपल्यापासून केलेला चुना असा दोन प्रकारचा चुना वापरला जाई. शंख शिंपले किंवा चुनखडीची बुकटी करण्यासाठी चुन्याचा घाना वापरला जाई. घाणीत प्रथम चुना व पाणी मळण्यात येते. त्यानंतर त्यात स्वच्छ धुतलेली चाळलेली ओली केलेली वाळू क्रमाक्रमाने त्यात मिसळून मळणे चालच ठेवतात. या क्रियांमुळे मिश्रण एकजीव होते. मळलेला चुना लगेच वापरणे योग्य असते. ते शक्य नसल्यास एकत्र ढीग करून सतत दमट ठेवावे लागते. असा तयार केलेला मसाला दोन तीन दिवसात वापरलाच पाहिजे.
भिंतीला गिलावा करणे झाल्यास तो गिलावा बांधकामाला चिकटून रहावा अशा रीतीने खरवडून खरबरीत करतात व नंतर त्यावर गिलाव्याचा पहिला हात चढवितात. गिलाव्याचा चुना करतांना चुन्याच्या पाऊणपट रेती किंवा सुरकी घालतात. जसजसा हा थर पुरा होत जाईल तसतसे त्यावर थापीने ठोकून उभ्या आडव्या रेषा पडतील अशा रीतीने तो मजबूत करतात. यावर दुसरा हात देतात. ह्यांत निम्म्याने अगदी बारीक वाळू घालतात व पुन्हा थापीने ठोकून गिलाव्याचा पृष्ठभाग गुळगुळीत करतात. ह्यावर तिसरा हात पांढऱ्या  स्वच्छ कळी चुन्यांत एकषष्ठांश रेती घालून व फडक्यांतून गाळून कुंचाने भिंतीला लावून घासून घासून गुळगुळीत करतात. भिंतीला द्यावयाची सफेती म्हणजे विरलेल्या शुभ्र चुन्यात भिंतीला चांगल्या रीतीने चिकटून राहण्यासाठी डिंग, किंवा सरस किंवा तांदुळाची खळ घालून तयार केलेला पातळ पदार्थ होय. तो भिंतीला लावण्याच्या वेळी इतका जाड असावा की त्याच्यात कुंचा बुचकळून बाहेर काढला असता तो त्यातून खाली गळू नये.
चुना चांगल्या प्रतीचा व्हावा म्हणून घोटला जात असे. चुना चांगल्या प्रतीचा झाला की नाही हे पाहण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरली जात असे. मोठ्या लोखंडी कढईमध्ये पाणी भरून त्यात उंचावरून चुन्याचा गोळा लाडू करून टाकला जात असे तो फुटला नाही तर पक्का चुना तयार झाला असे समजत असत.
बांधकामाच्या पूर्वतयारीमध्ये चुन्याची उपलब्धता हे सुद्धा एक महत्वाचे अंग असे. या पद्धतीने तयार केलेला चुना हा ताकदीला उत्तम असतोच, परंतु भिंतीमधून होणाऱ्या पाण्याची गळती रोखण्यासाठीही तो उत्तम असतो. अशा प्रकारे तयार केलेल्या चुन्याचे मिश्रण भिंतींना गिलावा देण्यासाठीही वापरतात. चुना कसा कालवावा, कोणत्या प्रकारचा चुना घ्यावा, तो लिंपावा कसा,  दगड कसे ठेवावेत ई माहिती पुढे आहे.
समुद्रातील उधाण भरतीला तोंड देणारे चिरे समुद्राच्या लाटांचा मार खाऊन खाऊन झिजले आहेत, मात्र दोन चिरे सांधणारा चुना अजून जसाच्या तसा आहे. दगड झिजून आत गेला आहे तर चुना वीतभर बाहेर डोकावत आहे. अशा पद्धतीने रचलेले बांधकामं आज अनेक शतकं ताठ मानेनं उभी आहेत. मात्र त्याची डागडुजी करण्यासाठी आज वापरलेल सिमेंट कॉंक्रीट एकाच पावसाळ्यात निखळून पडत आहे. कित्येक वाड्याचे भाग नाहीसे झाले परंतु जोते अजून शाबूत आहेत हे आपणाला पहायला मिळते. हे वास्तव बोलकं आहे.
चुन्याचे विविध उपयोग
· भिंतीतील दगड, विटा यांना घट्ट धरून ठेवणे.
· दगडावरील कळीकाम आणि भिंतीवरील गिलावा करण्यासाठी.
· पाईपलाईन मधील उभे- आडवे सांधे भरण्यासाठी.
· भूमिगत पाटाचे पाणी न्यावयाचे असेल तर.
· सर्व प्रकारच्या झाडांच्या क्षारांत चुना असतोच. शेतीसाठी  खत म्हणून त्याचे महत्त्व फार आहे. विशेषतः सेंद्रिय पदार्थाने समृद्ध असलेल्या जमीनीस तर या खताची अत्यंत जरूरी असते. या खताच्या योगे काही द्रव्यांचे विघटन होण्यास मदत होते.
· चुन्याचा वापर बांधकामा बरोबरच दूषित हवा शुद्ध करण्यासाठी सुद्धा  उपयोग करीत.
· ब्लीचींग म्हणूनही चुन्याचा उपयोग करतात.
·  चीट छापणारे, नीळ तयार करणारे लोकही चुन्याचा उपयोग करतात.
· दरवाजे, खिडक्या, भिंती रंगविण्यासाठी ही चुन्याचा उपयोग करतात.
·  विड्याच्या पानात  चुन्याचा उपयोग औषधी म्हणून करतात.
· असा हा बहुगुणी चुना.
सुरकी:- सुरकी म्हणजे ताज्या भाजलेल्या विटा अथवा खापराची दळून किंवा कांडून केलेली पूड होय. ही विटांची पूड स्वच्छ असून त्यात दुसरा कोणताही पदार्थ मिश्र असू नये. व ती एक इंचांत ६८ भोके असतील अशा चाळणीतून गाळल्यानंतर चुन्यात मिश्र करावी.
वाळू:- चुन्यामध्ये जी बारीक वाळू घालतात ती स्वच्छ व दाणेदार असून कठिण असावी. ती चाळून धुवावी, म्हणजे त्यात असलेली माती अशुद्ध पदार्थ निघून जातील.
मळलेला चुना घट्ट होण्यासाठीची क्रिया मंद गतीने घडत असते. व ती अनेक महिने किंवा काही वर्षे चालूच असते.
चुना तयार करण्यासाठी, कुटण्यासाठी बांधकामात वापरताना मजुरांच्या हाता पायांना  भेगा पडतात त्या पडू नये म्हणून हातापायांना लावण्यासाठी त्याकाळी तेल ही पुरवले जात असे.
कळावे,

Comments

Popular posts from this blog

Ellora Caves,

The Mystery of the Shell Grotto

Melted stairs in the Temple of Hathor.